| नागपूर | वृत्तसंस्था |
सैन्यातून निवृत्त झालेल्या व्यक्तीने प्रेयसीसाठी पत्नीचा छळ केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवानंद कृष्णराव काळबांडे (४९), रा. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. ते चंद्रपुरात जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरी करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे २००६ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे. यावेळी ते पत्नीसह उत्तरप्रदेशात कार्यरत होते. दरम्यान २०११ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालयात सिनिअर क्लर्क म्हणून नोकरीवर लागले.
यादरम्यान त्यांची एका महिलेशी जवळीक वाढली. २०१७ मध्ये ते आपल्या मुलीला चंद्रपूर येथे महिलेच्या घरी घेऊन गेले. यादरम्यान त्यांनी ती महिला तिची मोठी आई असल्याचे सांगितले. ही बाब मुलीने आईला सांगितली. त्यांनी पतीला विचारणा केली असता, देवानंद यांनी भांडण करून पत्नीला मारहाण केली. याशिवाय ही बाब व्हिडिओ कॉल करून प्रेयसीला दाखविली. २२ डिसेंबर २०२३ ला देवानंद यांच्या मोबाईलवर महिलेचे फोटो मुलीला दिसले. तिने ही बाब आईला सांगितली.
याबाबतही विचारणा केल्यावर देवानंद कागदपत्रे घेऊन घरातून निघून गेले. याशिवाय उदरनिर्वाहाकरिता पैसे देणेही बंद केले. त्यामुळे याबाबत मानकापूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर त्यांनी भरोसा सेलकडे प्रकरण पाठविले. सुरुवातीला सोबत राहण्याचे सांगून नंतर त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात मानसिक, शारीरिक छळाची तक्रार दिल्यावर मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.