। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना पाली-सुधागडच्या श्रीजा संदेश पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि मानाचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या जागतिक स्तरावरील दैदिप्यमान यशाबद्दल श्रीजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नुकतेच पाली-सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या हस्ते तिचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
काठमांडू येथील ‘राष्ट्रिय नाचघर, जमाल’ येथे रविवारी (दि.24) ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. ‘साऊथ एशियन फेडरेशन फॉर ऑल स्पोर्ट्स’ आणि ‘वर्ल्ड अमेच्युअर स्पोर्ट्स कौन्सिल’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विविध देशांतील कसलेल्या नृत्यांगनांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रीजाने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्याविष्काराने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तिरंगा अभिमानाने फडकवला.
श्रीजा पाटील हिच्या या ऐतिहासिक यशाची दखल घेत पाली-सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी तिची भेट घेतली. श्रीजा हिने पाली येथील ओम साई डान्स अकॅडमीमध्ये नृत्याचे धडे घेतले आहेत. तिचे डान्स गुरू अविनाश झोरे व आदित्य झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कठोर परिश्रम आणि सराव केला होता. तिच्या या यशात तिचे नृत्य दिग्दर्शक आणि कुटुंबियांचा मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले. श्रीजा ही मूळची अलिबाग वरसोली येथील असून पालीत वास्तव्यास आहे. श्रीजाच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आंतरराष्ट्रीय डान्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीजा पाटीलची सुवर्णभरारी
