| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील खालचा जीवना परिसरातील स्मशानभूमीच्या जवळ व सुबहान बीच रिसॉर्टच्या काही अंतरावर चरस या अंमली पदार्थाची पिशवी आढळून आली. सागरी गस्तीचे पोलीस शिपाई दर्शन गायकवाड समुद्रकिनाऱ्यावरती फिरत असताना त्यांना एक अज्ञात पिशवी आढळून आली.
याबाबतची माहिती त्यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये दिल्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे व उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर पिशवी ही समुद्राच्या पाण्याबरोबर किनाऱ्यालगत वाहून आल्याचे दिसून आले. तसेच ही पिशवी फाटलेली असल्याने त्याच्या आतील भागामध्ये एकूण नऊ प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. सदर प्लास्टिक पिशव्यांमध्ये चरस नावाचा अमली पदार्थ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी शासकीय पंच बोलावून सदर अमली पदार्थांच्या पिशवीचा पंचनामा केला आहे. सदर पिशव्यांचे एकूण वजन अंदाजे दहा किलो पाचशे ग्रॅम असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दापोली समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात देखील अशाच प्रकारे अमली पदार्थांच्या पिशव्या सापडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सर्व ठिकाणी तपास सुरू होता. पंचनामाच्या वेळी नायब तहसीलदार भुरके हे सुध्दा उपस्थित होते. सदर अमली पदार्थाच्या पिशव्या समुद्रात बोट फुटल्याने पसरल्या गेल्या असाव्यात किंवा सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीच्या भीतीने समुद्रात फेकून दिल्या गेल्या असाव्यात. असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी सापडलेला मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला आहे.मात्र समुद्र किनारी अज्ञात पिशवी आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. समुद्र किनारी बघ्यांची गर्दी जमली होती.