महाराष्ट्रात रविवार गाजला तो विविध राजकीय नेत्यांच्या जाहीर सभांनी.हिंगोलीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा तर रायगडात कोलाड येथे महामार्गाच्या दुरवस्थेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली.या दोन्ही सभांमधून ठाकरे बंधूंनी राज्यकर्त्यांना आपले लक्ष्य केले.तर बीडमध्ये झालेल्या उत्तरसभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.एकूणच रविवार दिवस सभांचा अन आरोपांचा असाच ठरला.
शासन आपल्या दारी, थापा मारतो लयभारी
| हिंगोली | प्रतिनिधी |
हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मशासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारीफ अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हिंगोली येथील सभेत बोलत असून, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सत्तधारी पक्षावर निशाणा साधला. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदावरी असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सापाला पायाखाली ठेचा
काही जणांना अपेक्षा असेल मी गद्दारांवर बोलेन, पण मी गद्दारांवर वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून, त्यावरच बोलणार आहे. मागे नागपंचमी झाली. आपण या गद्दाराला दूध पाजले पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायाखाली ठेचलं पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आ. संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला.
हे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात
सरकारवर आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, डबल इंजिन सरकार आणि आता त्यात अजितदादांचा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? मालगाडी होतेय यांची. तुमच्या पक्षात कर्तृत्व नाही? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात, पक्ष फोडला, पक्ष सोडला वडील माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागायची हिंमत राहिली नाही? चोरणार माझे वडील, इतर पक्षातील नेते चोरणार आणि म्हणणार आम्ही हिंदू आहोत. अरे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात. ही नामर्दांगी आहे.
टरबूज असा उल्लेख
हिंगोलीतील निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार टीका केला. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं मागे मी त्यांना कलंक बोललो, त्यांना फडतूस बोललो तर बोभाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवाय राज्यात दुष्काळ हे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टरबूज असा उल्लेख केला.