श्रीवर्धन: नारळफेकी स्पर्धा सुरु करण्याच्या हालचाली

| श्रीवर्धन | वार्ताहर |

नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. श्रीवर्धन शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील सालाबादप्रमाणे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मागील पंधरा वर्षांपूर्वी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव जातीय तणावामुळे बंद करण्यात आलेली नारळ फेकण्याची स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याचा काही मंडळी विचार करत आहेत. त्यासंदर्भात बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, ज्या कारणास्तव बंद झालेली स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यास पुन्हा जाती जातीत वाद होण्याची व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

श्रीवर्धनमधील जेष्ठ समाजसेवक कै. विनायक मापुस्कर यांच्या घरी सजवलेल्या पाच नारळांचे पूजन श्रीवर्धनचे तहसीलदार यांच्या हस्ते केले जाते. यावेळी पोलीस अधिकारी व शहरातील अन्य प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित केल जात. नारळाचं पूजन झाल्यानंतर आरती केली जाते. त्यानंतर नारळाना वंदन करून पारंपरिक पध्दतीने खालुबाजा सनई सहित मिरवणूक समुद्रकिनारी जाते. समुद्रकिनारी तहसीलदार व अन्य मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळांच विधिवत पूजन केल जाते. त्यानंतर हे पाच नारळ सागराला अर्पण करण्यासाठी पूर्वापार सरकार, शेट्ये, कुळकर्णी, वर्तक व अधिकारी असे पाच मानकरी असतात.

या मानकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शहरातील तरुण मुलं नारळ फेकण्याच्या स्पर्धेत सहभागी होत असत. कोणाचा नारळ (श्रीफळ) सर्वप्रथम सागराला अर्पण होतो, याकरिता वाद्याच्या गजरात एक धावण्याची स्पर्धा आयोजित केली जात असे. मात्र या स्पर्धेला कालांतराने जातीय रंग चढू लागला. श्रीफळ मानकऱ्यांचे पण माळी समाजाच्या मुलाने पहिला नारळ टाकला तर माळी समाजाचा नारळ पहिला पडला. भंडारी समाजाचा नारळ पहिला पडला, तर कधी कोळी समाजाचा नारळ पडला अशी चढाओढ निर्माण होऊ लागली. ज्याचा नारळ पहिला पडेल त्या समाजाचा धंदा रोजगार चांगला चालेल, अशी अंधश्रद्धा देखील पसरवली जात असे.

ज्या मंडळींना पुन्हा ही स्पर्धा सुरु करायची आहे, ते आयोजनात केव्हाही नसतात. नारळ फेकण्याची स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यास श्रीवर्धन शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन, शहरातील शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. यावर रायगडचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण गरजेचं आहे.

Exit mobile version