आंदोलकावर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा निषेध
| माणगाव | प्रतिनिधी |
दडपशाहीचा वापर करून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेध सर्व स्तरातून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.4) माणगाव तालुका सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता बालाजी कॉम्प्लेक्स येथे निषेध व्यक्त केला. तसेच बाजारपेठेतून सरकारविरोधी घोषणा देत माणगाव उपविभागीय कार्यलयावर धडक दिली. यावेळी राजू मोरे, संजोग मानकर, धनाजी जाधव, सुजित शिंदे, प्रशांत अधिकारी, गजानन अधिकारी, शंकर पवार, अरुण क्षीरसागर, शैलेश जाधव, संतोष शेलार, विश्वास खानविलकर, लोहित दळवी, महेंद्र कनोजे, महेंद्र दळवी, स्वप्नील वाघ, सुरज कडू, अनिल चव्हाण, आनंद थोरात, श्रीकांत जाधव, शरद कदम, प्रताप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
मराठा बांधवांनी तहसीलदार विकास गारुडकर यांना लेखी निवेदन देवून आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा निषेध नोंदवत दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरली. यानिमित्ताने निजामपूर, इंदापूर, लोणेरे, गोरेगाव, पाटणूस, विळेसह माणगाव तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवली होती. माणगाव येथील निषेध मोर्चात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा समाजाचे अनेक आमदार सरकारमध्ये आहेत. त्यांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवू.
राजाभाऊ रणपिसे, माणगाव