। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठेमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने याठिकाणी असलेली शौचालयांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत पालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनही या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे. याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी वॉर्ड ऑफिसरला धारेवर धरले.
आजमितीस दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरात मात्र सुलभ शौचालये अवघी दोन आहेत. ती पण रहदारी नसलेल्या जागी, तसेच ई-टॉयलेट सेक्टर 5, 6, 21 आणि 24 अशी चारच आहेत. जेथे जास्त गर्दी होत नाही, तिथे टॉयलेट बांधून पालिकेला आणि नागरिकांना काहीच फायदा होत नाही.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. पालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनही पालिका या गंभीर समस्येवर कानाडोळा करीत आहे. याबाबत आक्रमक होत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला अध्यक्षा उषा झणझणे व कार्याध्यक्ष शुभांगी खरात यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सचिन पांगरे, प्रमुख संघटक अल्पेश माने, गौरव पोरवाल, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, सचिन झणझणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वॉर्ड आफिसरला जाब विचारला. याबाबत पालिकेच्या अधिकार्यांनी लवकरच सकारात्मक पाऊल उचलू, असे आश्वासन दिले.
सार्वजनिक शौचालयावरून कामोठ्यात शेकाप आक्रमक
