| दुबई | वृत्तसंस्था |
भारतामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत 109 धावांची खेळी साकारणाऱ्या भारताच्या स्मृती मानधनाने आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले आहे. तसेच, तिने 828 रेटिंगची विक्रमी कमाईही केली आहे. ऑस्ट्रेलियाची ॲश्ले गार्डनर 731 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय विश्वकरंडका आधी एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत स्मृती मानधनाने धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच, आयसीसीच्या मासिक पुरस्काराची ती मानकरी ठरली. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉलवॉर्ड्ट ही तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंड संघाची कर्णधार नॅट सिव्हर ब्रंट ही चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिने पाचवे स्थान पटकावले आहे. तसेच, स्मृती मानधनाव्यतिरिक्त भारताची एकही फलंदाज अव्वल दहामध्ये नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर 18व्या, जेमिमा रॉड्रिग्ज 19व्या आणि दीप्ती शर्मा 24व्या स्थानावर आहे.






