सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो

पर्यटनासाठी पर्यटकांना बंदी
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात पावसाळ्यातील सृष्टी सौन्दर्य पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून पर्यटक येतात. मात्र सतत होणारे अपघात आणि पर्यटकांकडून नियमांची होत असलेली ऐशीतैशी यामुळे पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे. कर्जत तालुक्यातील सर्वत सुंदर आणि अपलावधीत प्रसिद्धी पावलेल्या सोलनपाडा येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांसाठी सर्वात आवडता परंतु झालेले अपघात यामुळे हे धरण पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे.

1980च्या दशकात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जामरुख येथे पाच लाख रुपये खर्चून पाझर तलाव बांधला. पुढे 2012मध्ये या तलावाची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करताना पाणीसाठा वाढवा यासाठी खोली अधिक करण्यात आली आणि मातीचा बांध आणखी मजबूत करण्यात आला. त्यामुळे लहान धरणात रूपांतर झालेल्या या धरणाच्या मुख्य जलाशयात कोणालाही जाण्यास पूर्वी परवानगी नव्हती आणि आजदेखील नाही.परंतु, पाटबंधारे विभागाने पुढील भविष्यातील खबरदारीचा उपाय म्हणून धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेथील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्याचा मार्ग अधिक भक्कम करतांना सांडवा नव्या पद्धतीने बांधून तयार केला. या सांडव्याचे नवीन रूप हे त्यातून पाणी खाली जाताना आणखी आकर्षक दिसते.
कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध अशा सोलनपाडा डॅमवर आठवड्याला किमान दहा ते पंधरा हजार पर्यटक येत असतात. या ठिकाणी येणारे पर्यटक फार मोठ्या प्रमाणा वर मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात, अनेक अल्पवयीन शाळा, कॉलेजमधील मुले, मूली आणि पर्यटक अतिशय तोकड्या कपड्यात सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून डॅमच्या पाण्यात किंवा आजूबाजूच्या झुडपात नको ते चाळे करीत असतात, अशा पर्यटकांमुळे या विभागातील लहान मुले आणि मुलींवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून सदर पर्यटकांना हटकले तर ते ग्रामस्थांना दमदाटी करत असल्याचे काही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. हेच मद्यधुंद पर्यटक आपल्या रिकाम्या दारुच्या बाटल्या आजूबाजूच्या माळावर किंवा शेतात फेकून देतात. त्यामुळे हजारो रिकाम्या बाटल्या या परिसरात फोडून फेकल्या जातात. त्यामुळे माळरानावर गुराख्यांना व शेतांमध्ये सर्वत्र पसरलेल्या या बाटल्यांमुळे शेतात कामे करणारे शेतकरी जखमी होत आहेत. या समस्येमुळे परिसरातील ग्रामपंचायती यांनी आपल्या हद्दीत येणार्‍या पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी 2016 मध्ये पहिल्यांदा केली आणि त्यानंतर 2017 पासून या ठिकाणी पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी आहे.

दरम्यान, आजही या भागातील सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची येण्याची इच्छा आहे. मात्र, स्थानिक काय बाहेरीलदेखील पर्यटक सोलनपाडाकडे फिरकू शकत नाहीत, असे नियोजन ग्रामस्थांनी केले आहे. त्यात प्रशासन यांच्याकडून ग्रामस्थांच्या मागणीनुसार पर्यटनावर बंदी घालत कलम 144 लागू केला आहे. त्यावेळी स्थानिकांनी रोजगार बुडवून हा निर्णय घेतला असून, ग्रामस्थांकडून देखील पर्यटक येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

Exit mobile version