महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथील घटना
। महाड । प्रतिनिधी ।
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार, विनयभंग, घरफोडी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. अशातच स्वतःच्या मुलानेच आईवर सुरीच्या साह्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील रुपावली सुंभेकोंड येथे समोर आली आहे. राजेंद्र मोतीराम सुंभे (24) असे आरोपी मुलाचे नाव असून विमल मोतीराम सुंभे असे जखमी आईचे नाव आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी (दि.2) सायंकाळच्या सुमारास विमल सुंभे या आपल्या घरात भांडी घासत होत्या. यावेळी अचानक आरोपी मुलगा राजेंद्र हा भाजी कापण्याचा सुरा घेऊन घटनास्थळी आला आणि कोणताही विचार न करता त्याने स्वतःच्या आईवर सुरीच्या साह्याने सपासप वार केले. पोटच्या मुलाने स्वतःच्या आईवर सुरीच्या साह्याने जीवघेणा हल्ला का केला, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र या हल्ल्यात आईची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचाराकरिता पनवेल येथे हलविण्यात आले आहे.
मुलगा आईवर सुरीने वार करत असताना आरोपीचे वडील मोतीराम सुंभे हे तिथे गेले. त्यांनी हा सगळा प्रकार बघितला आणि लगेचच आईवर हल्ला करणाऱ्या मुलाला बाजूला ओढून घेतले. याचाच राग मनात आल्याने आरोपी राजेंद्र याने स्वतःवर देखील सुरीने किरकोळ वार करून घेतले.
याप्रकरणी आरोपी राजेंद्र सुंभे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.







