| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालय आणि टेंभरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सारंग राजिप शाळेत मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळ्यांचे आजार असलेल्या नागरिकांची अत्याधुनिक यंत्राद्वारे डोळे तपासणी करुन मोफत आयड्राप वाटप करण्यात आले. या शिबिरातील मोफत डोळे तपासणीचा 89 रुग्णांनी लाभ घेतला. डोळे तपासणीत 17 रुग्णांना मोतिबिंदूचा त्रास असल्याचे दिसून आले. त्यांचे सवलतीच्या दरात दुर्बिणीद्वारे बिन टाक्याची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ .विशालाक्षी अर्चिस शेडबाळे (विंचुरकर) यांनी सांगितले. शिबीर यशस्वी करण्यासाठी टेंभरी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच व सदस्य कमिटी तसेच श्री समर्थ नेत्रालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.