अलिबाग गाडी बंद केल्याने प्रवासी निराश
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
महत्त्वाची अनेक प्रशासकीय कार्यालये असलेल्या अलिबाग या ठिकाणी श्रीवर्धन आगाराकडून अनेक वर्षे नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणारी श्रीवर्धन-अलिबाग गाडी आगाराकडून कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने प्रवासीवर्गाकडून निराशा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अलिबाग आगाराने श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवर्गासाठी अलिबाग-श्रीवर्धन फेरी सुरू करावी जेणेकरुन येथील प्रवासी सुखासुखी अलिबाग येथे आपापल्या कार्यालयीन कामासाठी जाऊ-येऊ शकतील.
सन 1987 साली श्रीवर्धन आगाराची स्थापना झाली. स्थापनेनंतर आगाराकडून मुंबई, बोरीवली, ठाणे, अलिबाग तसेच सातारा, दापोली, रत्नागिरी अशा लांब पल्ल्याच्या फेर्या सुरू करण्यात आल्या. माणगाव, महाड, रोहा, कर्जत यासह श्रीवर्धन तालुक्यातील दिघीपासून कोलमांडल्यापर्यंत स्थानिक फेर्यांमुळे श्रीवर्धन आगार रायगड विभागात आर्थिक उत्पन्नात अग्रेसर ठरत होता. सदरील सर्व गाड्या गावातून फेरी घेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य श्रीवर्धन आगाराने सार्थकी ठरवले होते.
श्रीवर्धन आगाराची कायम आर्थिक उत्पन्न देणारी गाडी म्हणजे श्रीवर्धन अलिबाग. श्रीवर्धन बसस्थानकातून सकाळी साडेपाच वाजता वेळापत्रकानुसार निघणारी ही गाडी श्रीवर्धन गावात फेरी घेत अलिबागकडे मार्गस्थ व्हायची. एकशे अठ्ठावीस किलोमीटरचे अंतर, पण श्रीवर्धन ते अलिबागपर्यंतच्या प्रत्येक थांब्यावर येता-जाता प्रवाशांसाठी गाडी थांबयची. साडेदहा वाजता अलिबाग बसस्थानकात गाडी गेल्यावर अलिबाग-पेण या दोन स्थानिक फेर्या झाल्यावर पुन्हा सायंकाळी सहा वाजता श्रीवर्धनकडे मार्गस्थ व्हायची.
महत्त्वाची अनेक शासकीय कार्यालये अलिबाग येथे असल्याने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवाशांसाठी श्रीवर्धन-अलिबाग गाडी उपयुक्त होती. 1987 सालापासून 2018 पर्यंत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणणारी गाडी अशी ख्याती असणारी गाडी अचानक आर्थिक उत्पन्न कमी का आणू लागली. अलिबाग आगाराची सायंकाळी साडेपाच वाजता पोलादपूर येथे मार्गस्थ होणारी गाडी पूर्ण क्षमतेने भरलेली, तर श्रीवर्धन आगाराची गाडी रिकामी हे कोडे न सुटण्यासारखे आहे. तालुक्यातील प्रवासीवर्गाने मागणी केल्यावर श्रीवर्धन-अलिबाग गाडी वडखळमार्गे तर एकदा प्रायोगिक तत्त्वावर मुरूड, रेवदंडामार्गे सुरू करण्यात आली; पण शेरा प्रवासी कमी, त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी. या कारणामुळे सदरची गाडी बंद करण्यात आली.
असा आहे गाडीचा प्रवास श्रीवर्धन तालुक्यातील प्रवाशांना अलिबाग येथे जाण्यासाठी पहाटेची मुंबई किंवा कल्याण गाडीने वडखळ गाठणे व पुढे अलिबाग. परतीच्या वेळेस वडखळ, माणगाव, म्हसळा करीत श्रीवर्धन