| आगरदांडा | प्रतिनिधी |
यंदा श्री गणेश चतुर्थी दि.14 सप्टेंबर रोजी येत असल्याने प्रतिवर्षाच्या गणेशोत्सव सणाला पुरत्या 80 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील बहुतांशी गावातील गणेश मूर्तीकारांसह नांदगावमधील काही मूर्ती कारागिरांनी मूर्त्या बनविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
यंदा दि.10 जून रोजीच्या विनायक चतुर्थीचा मुहूर्त साधून नांदगावमधील मूर्तीकार सतीश जोशी यांनी शाडूच्या मातीचे पूजन करून मूर्त्या बनविण्यास प्रारंभ केला आहे. सद्या मोसमी पावसाला सुरुवात झाली असली, तरी मधेच येथे कडक ऊन पडत आहे. त्याचा फायदा उठवित तयार मूर्त्या वाळविण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. नंतरच्या काळातील कामाची घाई टाळण्यासाठी लवकरच सुरूवात करण्यात आली आहे. शिवाय सद्यस्थितीत कामगारही उपलब्ध होत नाहीत. झालेच तर मजुरीचे दरही परवडत नसल्याने कमी कामगारात जास्त दिवस काम करून मूर्त्या तयार करण्याचे काम करतो. त्यामुळे ताणही पडत नाही, असे मूर्तीकार जोशी यांनी सांगितले. तसेच, यावर्षी देखील शाडूच्या मातीसह रंग साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्त्यांच्या दरात वाढ होणार असल्याचे मुर्तीकारांकडून बोलले जात आहे.







