पाणी कपातीच्या सल्ल्याला हरताळ; हजारो लिटर पाणी वाया
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायत हद्दीतील पाली-खोपोली महामार्गालगत असलेल्या भाग्यश्री प्लाझा इमारतीच्या अगदी समोर नगरपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ही गळती गेल्या अनेक दिवसांपासून लागली असून, हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. विशेष म्हणजे, या गळतीबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाली नगरपंचायतीने दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा अर्थात पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणाऱ्या नगरपंचायतीने आधी स्वतःच्या व्यवस्थेकडे पाहण्याची गरज नाही का? पाणीटंचाईचे कारण पुढे करून नागरिकांवर कपातीचा निर्णय लादण्यापूर्वी नगरपंचायतीने स्वतःच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती, अपव्यय आणि त्रुटी दूर करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरायची, पाणी कपात सहन करायची आणि प्रशासनाने मात्र स्वतःच्या व्यवस्थेतील उघड्या त्रुटींकडे कानाडोळा करायचा, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन भाग्यश्री प्लाझासमोरील मुख्य जलवाहिनीची गळती त्वरित दुरुस्त करावी. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीगळतीची दखल घेण्यात विलंब का झाला, याची चौकशी करून संबंधित जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
