| रायगड | प्रतिनिधी |
एसटीचा ठावठिकाणा प्रवाशांना आता एका क्लिकवर पाहता येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, प्रणालीची यशस्वी चाचणीही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे.
एसटी महामंडळातर्फे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर बसची माहिती सहज समजण्यासाठी समजण्यासाठी ऑनलाईन व्हीटीएस यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सद्यास्थितीला एसटी महामंडळातील 16 हजारांहून अधिक नव्या-जुन्या बसमध्ये व्हीटीएस ही आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेची विविध पातळ्यांवर चाचण्या करण्यात आल्या. यातून समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असून, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. ॲप विकसित करण्याचेही काम सुरू आहे.
काय होणार फायदा ?
रेल्वे प्रवाशांना नियोजित गाडी सध्या कुठे आहे, हे तातडीने कळते. त्याचप्रमाणे आता आरक्षण केलेल्या किंवा अपेक्षित बसची माहिती कोठे आहे, किती अंतरावर आहे, बस बिघडली आहे किंवा नाही, किती विलंब होणार आहे, याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे.
ग्रामीण भागात रस्ते आणि इंटरनेट महत्त्वाचे
एसटी महामंडळाची बस शहरी भागापासून ते ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यापर्यंत प्रवास करते. व्हीटीएस यंत्रणा परिपूर्ण आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी खेड्या-पाड्यातील रस्ते आणि इंटरनेट या सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत. खडतर रस्त्यांमध्ये यंत्रणेमध्ये बिघाड आल्याचे समोर आले होते. ही दुरुस्ती करून रस्त्यांच्या अनुषंगाने व्हीटीएसचे यंत्र आणि जीपीएस यंत्रणा साचेबद्ध करण्यात आली आहे. तसेच, अवघड घाट, डोंगराळ भाग, पठारांवर तसेच बोगद्यांमध्ये इंटरनेट बऱ्याचदा नसते. अशा वेळी प्रवाशांची गैरसोय होईल.