वैशाखाचे चटके; अगोठीच्या कामांना वेग

तापमान 40अंश सेल्सिअस पार

| माणगाव । वार्ताहर ।

नुकताच वैशाख महिना सुरू झाला आहे. हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातील दुसरा महिना असलेला वैशाख महिना प्रखर उन्हामुळे सर्वत्र ओळखला जातो. वैशाख आणि उन्हाचे चटके प्रसिद्ध आहेत. वैशाखांबरोबर 40अंश सेल्सिअसच्या पलीकडे जाणारे तापमान सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. हा महिना म्हणजे प्रचंड ऊन, पानगळ उष्ण, कोरडी हवा, वणवे असे समीकरण रूढ आहे.

या महिन्यातील गरम कोरडी हवा वाहत असल्याने या हवेला वैशाख वणवा असेही म्हणतात. याच महिन्यात रानातील फुलं-वेलींना बहर येतो. अनेक फुलझाडे, फलझाडे बहरलेली असतात. फळझाडांचा मोहर जाऊन फळे पक्व होतात. त्यामुळे हा महिना  सुखद बनतो. या महिन्यात अगोठीच्या कामांना वेग येऊन महिला पापड, लोणचे, मुरंबे बनवितात. मसाले बनवणे, पावसाळी दिवसांसाठी लागणारे विविध पदार्थ वाळवून, सुकवून साठवून ठेवणे. अशी कामे केली जातात. वैशाखाच्या उन्हात शेतकरी शेतीच्या विविध कामांमध्ये व्यस्त राहून तरवे भाजनी, शेतांची साफसफाई, गायी गुरांना पेंडा चारा साठवून ठेवणे. घर, गोठे यांची दुरुस्ती करत असतात.

या महिन्यात रानातील रानमेव्याला बहर येतो. करवंदे, जांभूळ, काजू, आंबे इत्यादी फळे सर्वत्र तयार होतात. याच महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात. साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा असणारा अक्षय तृतीया हा सण याच महिन्यात येतो. निसर्गचक्रात महत्त्वाचा असलेला महिना पावसाळा ऋतूची पायाभरणी करतो. निसर्गाला बहरण्यासाठी हा ऋतू अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याला माधव महिना असेही म्हणतात. नुकताच हा महिना सुरू झाला असून ऐन वैशाखाच्या कडक उन्हातही निसर्गप्रेमी फळाफळांचा आस्वाद घेत आहेत.

निसर्ग चक्रात वैशाख महिना अत्यंत महत्वपूर्ण आहे. रान फळे, फुले तसेच विविध सण समारंभ याच महीन्यात येतात. निसर्गचक्र पूर्ण करण्यासाठी हा महिना महत्वपूर्ण आहे.

हेमंत बारटक्के, निसर्गप्रेमी
Exit mobile version