| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील आध्यात्मिक वातावरण अधिक तेजस्वी करणार्या भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा 2025 येत्या रविवारी, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायं. 7 या वेळेत सिडको ऑडिटोरियम, जॉयआलुकास ज्वेलर्स समोर, सेक्टर 31, वाशी, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. यावेळी भव्य दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास गणेश नाईक (वनमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, पालघर) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी आमदार संदीप नाईक, माजी स्थानिक नगरसेविका फशीबाई करसन भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भजनी परंपरेतून सामाजिक दायित्व जपणारी रेल्वे प्रवासी भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असून, नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवराय भजन मंडळ, वाशी, श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ, वाशी व संलग्न नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पार पडणार आहेत.
या भक्तिमय सोहळ्यात एमएमआरडीए क्षेत्रातील मध्य, पश्चिम व हार्बर तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे प्रवासी भजन मंडळे सहभागी होणार असून, एक अभूतपूर्व भक्तिरसाचा महोत्सव येथे अनुभवता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रु. 11,011, द्वितीय रु. 8,011 तर तृतीय रु. 5,011 तसेच इतर 9 उत्तेजनार्थ विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या भक्तिपूर्ण सोहळ्यात सहभागी होऊन नामस्मरण व भजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.