पराभवामुळे दिल्लीचे आव्हान संपुष्टात
| चेन्नई | वृत्तसंस्था |
पथीराणा आणि दीपक चाहर यांच्या भेदक मार्याच्या जोरावर चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 168 दावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 140 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेन्नईचा या मोसमातील हा सातवा विजय होता. यामुळे ते आता 15 गुणांसह गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहेत. या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफच्या शर्यतीतील प्रवास जवळपास संपला आहे. चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करण्यात दिल्लीला गेल्या 13 वर्षांपासून अपयश आले आहे. या सामन्यात सीएसकेने दिल्लीचा एकतर्फी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावत 167 धावा केल्या होत्या.
चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धावा केल्या, याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायडू यांनीही अवघड विकेटवर चांगली फलंदाजी केली. शेवटी एमएस धोनीची 9 चेंडूत 20 धावांची झंझावाती खेळी खूप महत्त्वाची होती, तर रवींद्र जडेजानेही 21 धावांची चांगली खेळी केली. याशिवाय दिल्लीकडून मिचेल मार्शने 3 बळी घेतले. यामुळे तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अक्षर पटेलनेही 2 गडी बाद केले. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांनाही 1-1 असे यश मिळाले.







