सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका

आखारीपट जमीन हस्तांतरण प्रकरणाला नवे वळण

| रसायनी | प्रतिनिधी |

भाताण ग्रामपंचायत हद्दीतील आखारीपट जमीन प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, महाराष्ट्र शासनाने दि.19 मे रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाताण येथील सुमारे 15 एकर आखारीपट जमीन रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन (ॲमिटी विद्यापीठ) यांना देण्याचा निर्णय हा स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या भावनांवर घाला असल्याची भावना व्यक्त होत असताना आता नवीन धागेदोरे जोडणारा नेमका सूत्रधार कोण? याचा ग्रामस्थ शोध घेत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला आता नवीन कलाटणी मिळाली असून, सन 2010 सालातील एका कथित पत्रामुळे गावात नव्याने चर्चा आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हस्तांतरित करण्यात येत असलेल्या सुमारे 15 एकर आखारीपट जमिनीमध्ये सर्व्हे क्रमांक 8/0, 9/2, 10/3, 13/5, 14/0, 167/1, 178/0 आणि 182/4 यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या जमिनी पूर्वीपासून स्थानिक शेतकरी कसत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, या निर्णयामुळे गावात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या सर्व्हे क्रमांकांपैकी म्हणजे 167/1, 178/0 आणि 182/4 या तीन सर्व्हे नंबरांबाबत 10 मे, 2010 रोजी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर एक पत्र रितानचंद बळवंत एज्युकेशन यांना देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पत्रामध्ये शासनाची आवश्यक परवानगी मिळाल्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल, असा आशय असल्याचे सांगितले जात आहे. ते पत्र लवकरच आपल्या निदर्शनात येईल. मात्र, या पत्रावर आवक-जावक क्रमांक नसल्याचा आरोप होत असून, शासकीय दप्तरी त्याची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे हे पत्र नेमके कोणी तयार केले, त्यावरील हस्ताक्षर कोणाचे आहे, सही कोणी केली आणि ते अधिकृतपणे जारी झाले होते का,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Exit mobile version