सूर्यकुमारला संघात स्थान नकोचः गावस्कर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सूर्यकुमार यादव ट्वेंटी-20 क्रिकेटमधला जगातील नंबर वन फलंदाज आहे, परंतु एकदिवसीय सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता करता आलेली नाही. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारतीय निवडकर्त्यांनी आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघात त्याची निवड केली आहे. परंतु, सूर्यकुमारला अंतिम संघात स्थान देऊ नये, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, सूर्यकुमार यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत असे काहीही केलेले नाही की त्याला आगामी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर संधी दिली जावी. सूर्यकुमार सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये जी कामगिरी करत आहे, ते चौथ्या क्रमांकावर खेळताना इशान किशन आणि हार्दिक पांड्याही करू शकतात. सूर्यकुमारने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाही. तो फक्त शेवटच्या 15-20 षटकांमध्ये फलंदाजी करतो, जिथे तो त्याच्या ट्वेंटी-20 मधील क्षमतेचा वापर करतो, जे महत्त्वाचे आहेच. पण, हार्दिक पांड्या, इशान किशन आणि लोकेश राहुल हेदेखील सूर्यासारखी खेळी करू शकतात. त्यामुळे श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार आहे. सूर्यकुमारला आणखी थोडी वाट पाहावी लागेल आणि जर त्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली तर त्याला शतक झळकावे लागेल आणि आपणही शतके ठोकू शकतो हे दाखवावे लागेल, असेही गावस्करांनी नमूद केले.

Exit mobile version