सूर्यकुमारचा नवा विश्‍वविक्रम

लंकेला नमवून मालिकाही जिंकली

| पुणे | प्रतिनिधी |

भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 91 धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्‍वविक्रम केला आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत शतक पूर्ण केले. असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामी शिवाय 3 शतके झळकावता आलेली नाहीत.

भारताचा मिस्टर 360 डिग्री बॅटर म्हटल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या आधी जगात असे फक्त चार क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत, परंतु हे सर्व खेळाडू सलामीला खेळताना शतक झळकावण्यात यशस्वी ठरले आहेत. पण सूर्यकुमार यादवने दोनदा चौथ्या क्रमांकावर आणि एकदा तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावले आहे.

सर्वात जास्त शतके
भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. आता त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत. सूर्या आता 3 शतकांसह दुसर्‍या तर केएल राहुल 2 शतकांसह तिसर्‍या स्थानावर आहे. त्यांच्याशिवाय सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

Exit mobile version