| पुणे | प्रतिनिधी |
राजगड किल्ल्यावर असलेल्या अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. कोमल शिंदे (21), रा. आळंदी, पुणे असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. शिंदे दाम्पत्य राजगडावर फिरायला आले असताना गुरुवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल या पतीसोबत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेले असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोमल शिंदे या बालेकिल्ल्याच्या अति बिकट वाटेवरुन 400 फूट खाली कोसळल्या. संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायवाटेवर असणाऱ्या कड्याच्या खडकावर आपटून त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा झाल्या होत्या. परिणामी जोरदार रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह रेस्क्यू पथकाने गडावर धाव घेत रात्री उशिरा कोमल यांचा मृतदेह गडावरून खाली आणला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेल्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.