नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावातील बहुतेक रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय केले जात आहेत. त्या व्यवसाय करणार्या टपरीधारक यांच्याकडून आता नेरळ ग्रामपंचायत कर वसूल करणार आहे. दिवंगत सरपंच रावजी शिंगवा यांनी रस्त्यावर बसून व्यवसाय करणार्या दुकानदार यांच्याकडून कर वसूल करण्याचा ठराव घेतला होता. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता रस्त्यावर तसेच फुटपाथवर बसून व्यवसाय करणार्या दुकानदार करणार्यांकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेरळ ग्रामपंचायतने आता केवळ गणेश घाट परिसरात नाही तर नेरळ बाजारपेठ भागात रस्त्यावर आणि फुटपाथ वर बसून व्यवसाय करणार्या सर्वांकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी गणेश गायकर यांनी दिले आहेत. त्या ठरावानुसार ग्रामपंचायत आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्मचारी वर्गाचे पगार यांच्यासाठी अतिरिक्त पैशाची असलेली गरज लक्षात घेऊन दुरुस्ती करून घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता गेली अनेक वर्षे ग्रामपंचायतला एक रुपयाचा कर न भरणार्या फुटपाथ वर व्यवसाय करणारे यांच्याकडून कर स्वरूपात दैनंदिन कर वसूल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.