| माणगाव | प्रतिनिधी |
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित शालार्थ प्रकरणांमुळे निर्माण झालेल्या अडचणी, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनियमितता आणि प्रशासकीय विलंबाच्या निषेधार्थ मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने गुरुवारी (दि.12) वाशी येथील मुंबई विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दुपारी 1.30 वाजता वाशी रेल्वे स्थानकातून निघून घोषणाबाजी करत दुपारी 3 वाजता शिक्षण मंडळ कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे 350 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चादरम्यान प्रा. मुकुंद आंधळकर, प्रा. अमर सिंह, प्रा.प्रकाश दीक्षित, प्रा. रविंद्र भदाणे, प्रा. सुरेश अहिरे, प्रा. विलास खोपकर, प्रा. नितीन पाटील आणि प्रा. मणी यांनी शिक्षकांच्या समस्यांवर भाष्य करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, सध्या विभागात 106 शालार्थ प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी 53 प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता सुरू आहे. मागील 15 दिवसांत 33 शिक्षकांना शालार्थ देण्यात आले असून उर्वरित सुमारे 20 शिक्षकांना गुढी पाडव्यापूर्वी शालार्थ दिले जातील. तसेच, नव्याने प्राप्त झालेल्या 53 प्रस्तावांनाही पुढील तीन आठवड्यांत शालार्थ देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यापुढे शालार्थचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांत त्यावर कार्यवाही करण्याचे धोरण राबवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांचा शिक्षण मंडळावर मोर्चा
