येत्या 25 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावी, अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांकडून जोर धरत आहे. शासन निर्णयाविरोधात येत्या 25 सप्टेंबर रोजी सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत 15 मार्च 2024 व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या शासन निर्णयाविरोधात सर्व शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात शिकणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे या निर्णयामुळे प्रचंड नुकसान होण्याची भीती शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे. वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दि.25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार सर्व संघटनांच्या बैठकीत पुणे येथे घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी मोर्चाची तयारी सुरू केली आहे. जिल्हा, तालुका स्तरावर बैठका घेऊन त्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षकांना शाळा बंदसह मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार 528 शाळा असून, पाच हजार 545 शिक्षक 91 हजार 343 विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे येत्या 25 सप्टेंबरला या शाळा बंद ठेवणार असल्याची माहिती शिक्षक संघटनेकडून देण्यात आली आहे.