स्थानिक भूमिपूत्र विरूध्द मोर्चेकऱ्यांचा वाद
| पेण | प्रतिनिधी |
जेएसडब्ल्यू कंपनीच्याविरोधात शनिवारी (दि.12) शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी कंपनी गेटवर मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु ज्यांना रोजगार हवा आहे त्यांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यातच कंपनी गेटवर मोर्चासाठी आलेले मोर्चेकरी आणि ज्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांच्या समय सुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मोर्चाकर्त्यांकडून माजी मंत्री सुभाष देसाई, रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, बबनदादा पाटील, महिला संघटिका दीपश्री पोटफोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने कंपनी प्रशासनाशी चर्चा करून भूमिपुत्रांना नेाकरीत भरती करून घेणे, पाटणसई ते डोलवी पर्यंतच्या 45 गावांना फिल्टर्स पाणीपुरवठा. त्यानंतर कंपनीपासून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यासाठी ठोस उपाययोजना. त्याचप्रमाणे कंपनीमधून सोडण्यात येणारे प्रदूषित सांडपाणी धरमतर खाडीत सोडण्याअगोदर त्यावर उपाययोजना करणे जेणेकरून प्रदूषणामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार नाही, आदी मुद्दयांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांना मान्यवरांनी संबोधित केले.

कंपनीची वाढ ही व्हायलाच पाहिजे. त्याचं आम्ही स्वागतच करतो. कंपनी वाढली नाही तर रोजगार उपलब्ध कसा होईल. मात्र रोजगार वाढत असताना तो भूमिपुत्रांना मिळावा हीच अपेक्षा. आम्हाला काही नको स्थानिकांना नोकऱ्या द्याव्यात. शिवसेना आमजनतेच्या पाठिशी आहे.
सुभाष देसाई, माजी मंत्री
स्थानिक भूमिपूत्रांची पाठ
सर्वांना अंदाज होता की स्थानिक भूमीपुत्रांसाठी आंदोलन असल्याने मोठया प्रमाणात स्थानिक भूमीपुत्र आंदोलनात सहभागी होतील. मात्र अक्षरशः मोर्चाकडे स्थानिक भूमिपुत्रांनी पाठ फिरविल्याचे प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे गोष्ट लक्षात आली ती, म्हणजे विष्णू पाटील भूमिपुत्रांसाठी कितीही लढले तरी त्यांना स्थानिक मदत करत नाहीत. यापेक्षा शोकांतिका ती काय? गेली आठ दिवस विष्णू भाईंनी मोर्चासाठी खूप मेहनत घेतली खरी, पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.
आम्हाला आज दिलेला शब्द पूर्ण झाला नाही तर, पुन्हा आम्ही मोर्चा काढू. खेकडयांना चिरडण्याची भूमिका स्वीकारु, 15 दिवसात नोकर भरती केली नाही तर कंपनीत घुसू आणि परप्रांतीय कामगारांना हाकलून लावू.
विष्णू पाटील, शिवसेना नेते
बबनदादा पाटील यांनी रोखठोक पध्दतीने मोर्चाला सामोरे येणाऱ्यांना बजावले की, वाघांना रोखण्यासाठी कुत्र्यांनी सामोर येऊ नये, असा इशाराही दिला. याच मुद्यावर बोलताना स्थानिकांनी मात्र आम्ही स्थानिक भूमिपूत्र आहोत, बबनदादांनी पनवेलमध्ये किती जणांना नोकऱ्या लावल्यात, त्यांनी पनवेल सांभाळावे, त्यांनी पेणमध्ये लुडबुड करू नये, पेणकरांना नोकरीला लावण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. कोण वाघ आणि कोण कुत्रे हे पेणकरांना सांगू नये, असा प्रतिहल्ला केला. स्थानिक रोजगार असणारी मंडळी आणि शिवसेना मोर्चेकर्ते यांच्यामध्येच वाकयुध्द पहायला मिळाले. मोर्चात अनिष्ठ काही घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली 105 पोलीस, 21 पोलिस अधिकारी असा मोठा फौज फाटा जेएसडब्ल्यू कंपनीच्या गोवा गेटवर हजर होता. मोर्चामध्ये साधारणतः 500 जणांनी सहभाग घेतला होता. तर स्थानिक भूमिपूत्र म्हणून 150 च्या आसपास तरुण हजर होते.
मिध्यांची निर्मिती दलालीतून : सुरेंद्र म्हात्रे
शिंदे गटाच्या राजा केणी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता राजा केणी यांचा खरपूस समाचार घेतला. म्हात्रे यांनी सांगितले की, मुळातच मिध्यांची निर्मिती दलालीतून झाली आहे. दलाली करणाऱ्यांनी आमच्यावर बोलायच नाही. जो राजा केणी विष्णूभाईंचं नाव लावून दुचाकी फिरवत होता त्याच्याकडे एवढा पैसा आला कोठून, उगीच आम्हाला तोंड उघडायला लावून नये. आमच्याबाबत दलालांना बोलण्याची औकात नाही. आज इकडे, उद्या तिकडे अशांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत. तसेच, आमचा मोर्चा हा जनसामान्यांसाठी होता. मग आतापर्यंत राजा केणी आणि त्यांच्या आमदारांनी किती वेळा मोर्चा काढण्याचे पत्र दिले. मात्र मोर्चा का काढला नाही, महत्वाचं म्हणजे सर्व सामान्यांची दिशाभूल करणे हा दलालांचा काम आहे. त्यांनी त्यांच्या लायकीत रहावे एवढेच आपल्या मार्फत मी त्यांना बजावत आहे, असा सज्जड दमही दिला.