तळा ग्रामीण रुग्णालय येत्या आठ दिवसात सुरू होणार
| तळा | वार्ताहर |
‘तळा रुग्णालयाला अद्याप टाळेच’ या मथळ्याखाली मंगळवार, दि. 3 ऑगस्ट रोजी कृषीवलने गंभीर प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर संबंधित जिल्हा आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली. दरम्यान, येत्या आठ दिवसात तळा ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात येईल, असे लेखील आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिले आहेत. याबाबत तळा विकास आघाडीकडून दि. 4 सप्टेंबर रोजी वर्षश्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यापुढे रुग्णालय प्रशासन नमले आहे. दरम्यान, कृषीवलने आवाज उठविल्याबद्दल सर्व स्तरातून आभार व्यक्त होत आहेत.
तळा तालुका विकास आघाडीने तळा ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात घेतलेला पवित्रा दोन वर्षांचे वर्षश्राद्ध घालण्याचं आयोजन 4 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने घेतली असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी 10 कॉट, इमर्जन्सी वॉर्ड सुरू करण्याचे आश्वासन दिले असून, प्रशासनाने 3 वैद्यकीय अधिकारी, 2 परिसेविका 2 अधिपरिचारिका, 2 चतुर्थ श्रेणी कर्मचारी, 5 आयसीयू बेड्स, एक्सरे मशीनरी, संगणक साहित्य व वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैद्यकीय अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालय आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले असल्यामुळे दि.4 सप्टेंबर रोजी होणारे वर्षश्राद्ध आंदोलन हे तूर्तास मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
तळा विकास आघाडीने यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, या आंदोलनाची जिल्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेतली आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीप्रमाणे तळा विकास आघाडीने यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले ग्रामीण रुग्णालय सुरू होणार असून, यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या समस्या लवकरच मार्गी लागणार आहेत.