। कोलाड । वार्ताहर ।
15 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. यानंतर हिवाळा सुरु होईल असे वाटत होते. परंतु त्यानंतर ही 23 ऑक्टोबरपर्यंत वीज वार्यासह जोरदार तुफान पाऊस सुरु होता. यामुळे या परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर दोन तीन दिवसापासून पावसाने उघाड दिल्यामुळे तापमाणात बद्दल झाला असून उशिरा का होईना कोकणात गुलाबी थंडीची चाहूल लागली असल्यामुळे ऑक्टोबर हिटने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शुक्रवार दि.25 ऑक्टोबरपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असून कोकणातील सौंदर्याला भर घालणारे आहे. कोकणातील वळणावळणातील घाट रस्ते आणि त्याचे सौंदर्य थंडीच्या चाहूलीने अधिक खुळले आहे. धुक्यातून अंधुक दिसणारे डोंगर व इथली लपवाछपवीचा डाव खेळणारी हिरवाई, वळवळणावर हरवलेला रस्ता हा आनंद वेगळा दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत हा आनंद पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. असे असले तरी मुंबई-गोवा हायवे रस्त्यावरून तसेच डोंगर-दर्यातून वाट काढताना धुक्यातून समोरील रस्ता दिसत नसल्याने वाहनचालकांनी वाहन चालवतांना खबरदारी घेणे आवश्यक आहे.