पुरातील पाण्यातून वाचविले अनेकांचे प्राण
महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील तांबड भुवन व कुंभार आळीचा भाग हा सावित्री नदी काठचा भाग. या भागात येणाऱ्या पूराच्या वाहत्या पाण्याला मोठा वेग असतो. अशा वाहत्या १५ फूट पाण्यातून घरात अडकलेल्या अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची जिगरबाज कामगिरी तांबडभुवन मधील युवकांनी बजावली. त्यांच्या धाडसी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाड शहरात यावर्षी दि २२ व २३ जुलै रोजी आलेल्या पुराचे पाण्याने यापूर्वी आलेल्या महापूराचे सर्व रेकॉर्ड तोडले. ज्या उंच भागात कधीच पूराचे पाणी घुसले नाही त्या ठिकाणीही ५ ते ६ फूट पाणी होते. अशा परिस्थितीत खोल गट व सखल भागातील तांबडभुवन व कुंभारआळी परिसरात तर भयानक परिस्थिती होती. हा परिसर सावित्री नदीच्या बाजुलाच असल्याने या भागात येणारे पुराचे पाणी वाहते असते. अशा पाण्यात उतरुन एखाद्याचे प्राण वाचवणे व त्याला सुरक्षित ठिकाणी नेणे हे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही अवघड असते. मात्र याही परिस्थितीत तांबड भुवड मधील २० ते ३० वयोगटातील बाळू गोविलकर, रोहन पवार, अक्षय चाळके, कुणाल शिंदे, शुभम शिंदे,यश नटे, मंगेश जगताप, कौस्तुभ ठोंबरे या
युवकांनी पोहण्याचा फारसा सराव नसतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या घरा मध्ये अडकलेल्या मिंडे, गोविलकर, कुंभार, खैरकर, पवार, नटे, शिंदे, नातेकर, जंगम कुटुंबियांना हातात मिळेल त्या साधनाचा वापर करून सुरक्षित स्थळी हलवले. तांबड भुवन वेताळवाडीतील हा परिसर म्हणजे चिंचोळा भाग. या भागातून टायर ट्युब वरून अडकलेल्या पूरग्रस्तांना काढणं म्हणजे मोठं कसबच होतं मात्र या जिगरबाज युवकांनी धाडसी कामगिरी करीत अनेकांचे प्राण वाचवले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाड भेटी साठी आलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्या पत्नी सौ आशा गवळी यांनी तांबड भुवन मधील या युवकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.