वर्षभरापूर्वी विद्यमान खासदारांच्या हस्ते उद्घाटन
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा खंडीत आहे. जानेवारी 2024 मध्ये या शाळेच्या इमारतीचे खा. तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, वर्ष झाले तरी शाळेतील वर्ग खोल्या अंधारातच आहेत. विशेष म्हणजे वडवली हे सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेले गाव आहे.
वडवली गावातील अत्यंत जुनी व जीर्ण झालेली जिल्हा परिषदेची मराठी शाळा मोडकळीस आली होती. शाळेची धोकादायक स्थिती पाहता खा. तटकरे यांनी सीएसआर फंडातून शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण केले. गेल्यावर्षी इमारतीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध देखील करून देण्यात आल्या होत्या. मात्र, लाईट फिटिंग न केल्याने शाळेत वीजपुरवठा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे, मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अंधारातच बसावे लागत आहे. वीज नसल्याने ई-लर्निंग सारख्या अत्याधुनिक शैक्षणिक प्रणालीचा बट्ट्याबोळ झाला आहे. याशिवाय डिजिटल शाळेचा देखील बोजवारा उडाला आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या साडेतीनशे इतकी आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेत मुले कमी झाल्याचा कांगावा करत आहे आणि जिथे मुले शिकत आहेत तेथे सुविधा न देण्याच्या जिल्हा परिषद विभागाच्या दुट्टपी भूमिकेवर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, प्रत्यक्षात गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना त्यांच्या मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याचे या प्रसंगातून अधोरेखित होत आहे. त्यामुळे शालेय अधिकारी नेमके करतात काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
वडवली शाळेत वर्षभर वीजपूरवठा नाही. विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या लाईट शिवाय कशा राहू शकतात? विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडवणार? याबाबतीत शिक्षणाधिकार्यांकडे बोलणे झालेले आहे, पत्र देखील दिले आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही नाहीच.
सुनील नाकती,
ग्रामस्थ
वडवली शाळेत वीजपुरवठा नसल्याबाबत मला माहित नाही. मात्र, वर्गखोल्यांतील लाईट फिटिंग बाबत पाठपुरावा घेतला जाईल. शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावे यासाठी देखील पाठपुरावा घेतला जात आहे.
पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी, अलिबाग