महाराष्ट्राच्या मुली ठरल्या सरस

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत बाजी
पुणे । वृत्तसंस्था ।
तिसर्‍या एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी कोल्हापुरच्या खेलो इंडिया सेंटर संघाचा एकमात्र गोलच्या जोरावर 1.0 असा पराभव केला.
दोन समान ताकदीच्या संघात झालेल्या लढतीत तुल्यबळ खेळ बघायला मिळाला. पूर्वार्धात शलानी शाकुरे हिने 18 व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या नाशिक अकादमी संघाने यजमान एसएनबीपी अकादमी संघाचा 2.0 असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सत्रातच वैष्णवी भोईटे हिने दोन्ही गोल केले. पहिला गोल तिने सातव्या मिनिटाला आणि दुसरा गोल दहाव्या मिनिटाला केला. या पहिल्या सत्रातील गोलनंतर नाशिकने आघाडी अखेरपर्यंत कायम राहिल याची काळजी घेतली.
यावेळी विजेत्या संघाला रोख 50 हजार रूपयाचे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ ऑलिंपियन डॉ.धनराज पिल्ले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.वैशली भोसले आणि संचालक अ‍ॅड.ॠतुजा भोसले, स्पर्धा समन्वयक फिरोज शेख, संयोजन सचिव विभाकर तेलोर उपस्थित होते.

Exit mobile version