तळा येथील रुग्णालयाचे लोकार्पण
| तळा | वार्ताहर |
तळा ग्रामीण रुग्णालयात कोणतीही यंत्रसामुग्री, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नसताना पालकमंत्र्यांकडून या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील सत्तासंघर्ष विकोपाला गेला असून, सरकारही धोक्यात आले. अशा वेळी मंत्रीपद जाण्याच्या भीतीने फक्त श्रेय लाटण्यासाठी घाईघाईत या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आल्याची कुजबूज नागरिकांमध्ये आहे. कोणतीही यंत्रणा अद्याप याठिकाणी नसताना उद्घाटनाची घाई कशाला, असा सवालही विचारला जात आहे. तळा शहरात बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मंगळवार, दि.28 जून रोजी उद्घाटन केले. मुळात, ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही, तसेच रुग्णालयासाठी अद्याप वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग मंजूर करण्यात आला नसतानाही, या ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात सध्या सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. आणि, असे झाले तर पालकमंत्री आदिती तटकरे यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच की काय, ग्रामीण रुग्णालयात कोणतीही यंत्रसामुग्री, वैद्यकीय अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उपलब्ध नसताना या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. याआधी दोन वर्षांपूर्वी महागाव ग्रामीण रुग्णालय तसेच गेल्या वर्षी मांदाड ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 15 पदे मंजूर आहेत; परंतु त्या ठिकाणी सर्व पदे भरली गेली नसून, बहुतांश पदे अद्यापही रिक्त आहेत. अशातच आता पदे भरलेली नसताना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ग्रामीण रुग्णालय वास्तूच्या उद्घाटनाची घाई का केली, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. जर का सत्ताबदल झाले, तर सदर कामाचे श्रेय घेता येणार नाही, यामुळेच घाईघाईने ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, विरोधी पक्षनेत्या नेहा पांढरकामे, माजी राजिप सदस्य बबन चाचले, माजी उपसभापती गणेश वाघमारे, नगरसेवक मंगेश शिगवण, नरेश सुर्वे, तालुकाध्यक्ष नाना भौड, शहराध्यक्ष महेंद्र कजबजे, अॅड. उत्तम जाधव, चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार श्री. कनशेट्टी, पोलीस निरीक्षक श्री. ओमासे, माणगाव कॉटेजचे डॉ. इंगवले, कार्यकारी अभियंता महेश नामदे, उपअभियंता श्रीकांत गणगणे, कनिष्ठ अभियंता एकनाथ लाडाणे, सिविल सर्जन डॉ. माने, तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र मोदे, डॉ. संदीप होनसांगडे, कर्मचारी वर्ग आणि तळावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.