साराच्या मृत्यूला आरोग्य यंत्रणाच जबाबदार

पेणकरांकडून संताप व्यक्त

| पेण | प्रतिनिधी |

पेण उपजिल्हा रुग्णालयात आठही वैद्यकीय अधिकारी पदे भरलेली असतानादेखील दि.26 रोजी प्रीती पाटील या एकट्याच डॉक्टर ड्युटीवर कशा, असा प्रश्न पेणकर उपस्थित करत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच निष्पाप साराचा नाहक बळी गेल्याने पेणकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

उपजिल्हा रुग्णालय पेण येथील लिपीक विभागातून ज्या वेळेला माहिती घेतली, त्या वेळी असे लक्षात आले की, जिल्हा उपरुग्णालयात एकूण आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा असून, यामध्ये एक वैद्यकीय अधीक्षक आणि उरलेले सात हे वैद्यकीय अधिकारी आहेत. असे असतानादेखील सारा ठाकूरवर उपचार होताना केवळ एकच डॉक्टर ड्युटीवर होत्या. जिल्हा उपरुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे साराला आपला जीव गमवावा लागला आहे.

साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यातच जिल्हाधिकारी रायगड यांनी आदेश काढला होता की, कोणत्याही अधिकाऱ्यांनी आपले मुख्यालय सोडण्याअगोदर आपल्या वरिष्ठांना कळवायचे आहे. असे असतानादेखील डॉ. प्रीती पाटील वगळता इतर सर्व डॉक्टरांनी आपले मुख्यालय बेजबाबदारपणे सोडले होते, असेच म्हणावले लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, वैद्यकीय अधीक्षक हे रुग्णालयाचे प्रमुख असतात. मात्र, 26 जुलै रोजी वैद्यकीय अधीक्षक संध्या राजपूत ह्या मुख्यालयात नव्हत्या. सात वैद्यकीय अधिकारी असतानादेखील एकच वैद्यकीय अधिकाऱ्याला ड्युटी कशी देण्यात आली? तसेच त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सर्पदंशावर कशा प्रकारे उपचार केले जातात याबाबत काहीच माहिती नव्हती, हेही तेवढेच सत्य आहे. याचाच अर्थ, वैद्यकीय अधीक्षकांनी आपल्या कर्तव्यात व जबाबदारीत कुचराई केली असल्याचेच सिद्ध होते.

वैद्यकीय अधिकारीच जबाबदार
जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास देवमाने यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समितीचे गठन केलेले आहे. त्याच चौकशी समितीच्या सदस्या डॉ. शीतल जोशी अतिरिक्त शल्य चिकित्सक चौकशीसाठी पेण येथे उपजिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. ते त्यांचा अहवाल काय द्यायचा ते देतील; परंतु साराचा जीव हा फक्त नि फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच गेला आहे, असेच म्हणावे लागेल.

बचावासाठी डॉक्टरांचा कांगावा
पूर्ण उपजिल्हा रुग्णालयाचा विचार केल्यास एकूण 94 जागा असून, त्यातील 10 जागा फक्त रिक्त आहेत. ज्या 10 जागा रिक्त आहेत, त्यामध्ये परिचारिका 1, औषध निर्माता 2, कक्ष सेवक 1, सफाई कामगार 1, वाहन चालक 1, चतुर्थ क्षेणीतील 2, ए.एन.एम 1 यांचा समावेश आहे. परंतु, ही पदे जरी रिक्त असली, तरी त्याचा रुग्णावर उपचाराचा काहीच फरक पडू शकत नाही, हेही तेवढेच सत्य आहे. परंतु, जिल्हा उपरुग्णालयाचे डॉक्टर स्वतःचा बचाव करण्यासाठी पद रिक्त आहेत, असा कांगावा करत आहेत, हे उपरुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरूनच सिद्ध होत आहे. तरी सारा ठाकूर हिच्यावर उपचारादरम्यान झालेल्या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पेणकरांमधून जोर धरत आहे.

Exit mobile version