रुग्णालयांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

फायर ऑडिटसाठी करोडोंचा खर्च

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गेल्या काही कालावधीमध्ये सरकारी रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मोठी दुर्घटना घडण्याआधीच सरकार आणि प्रशासनाने यातून धडा घेत रायगड जिल्ह्यातील एक जिल्हा सरकारी रुग्णालय, सहा उपजिल्हा रुग्णालय आणि आठ ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. यासाठी सहा कोटी 50 लाख 70 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. फायर ऑडिट करुनही आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत, मग अशा कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या फायर ऑडिटची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रायगड जिल्हा हा महानगरांना खेटून असणारा विकसित होत असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग तसेच मुंबई-मांडवा (अलिबाग) असा जलमार्ग असे प्रमुख मार्ग आहेत. हे महामार्ग रायगड जिल्ह्याला अतिशय जलद आणि सुलभपणे जोडणारे आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे जाळे आहे. तसेच विविध पर्यटनस्थळे असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. शहरी, निम शहरी आणि ग्रामीण भागात लोकवस्ती विखुरलेली आहे. नागरिकांचे आरोग्य सुस्थित राहावे यासाठी जिल्ह्यामध्ये अलिबाग हे मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय, माणगाव, पनवेल, पेण, कर्जत, रोहा आणि श्रीवर्धन येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आलेले आहे. तर महाड, उरण, चौक, कशेळे, मुरुड, म्हसळा, जसवली, पोलादपूर येथे ग्रामीण रुग्णालय आहेत.

जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार केले जातात. ज्या रुग्णांवर अधिकचे उपचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात येते. जिल्हा रुग्णालयाची इमारत मोठी आहे. या ठिकाणी विविध यंत्र सामुग्री आहे. यातूनही एखाद्या रुग्णावर अधिक उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात येते. मध्यंतरी राज्यभरातील काही रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्याने रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अलिबागमधील जिल्हा सरकारी रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे, त्यावेळीदेखील फायर ऑडीट झाले होते, तरीदेखील आग कशी लागली हा प्रश्न होता. याबाबतचा अहवाल पुढे आलाच नाही, जर का आला असेल तर तो उघड केला गेला नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. ज्या ठिकाणी अशा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचे समोर आले होते.

फायर ऑडिट पूर्ण – झालेला खर्च
सरकारी रुग्णालय अलिबाग – दोन कोटी 18 लाख रुपये
उपजिल्हा रुग्णालय माणगाव – एक कोटी 38 लाख रुपये
उपजिल्हा रुग्णालय पनवेल – 00 रुपये
उपजिल्हा रुग्णालय पेण – एक कोटी 34 लाख रुपये
उपजिल्हा रुग्णालय कर्जत -15 लाख 87 हजार रुपये
उपजिल्हा रुग्णालय रोहा – 14 लाख 93 हजार रुपये
उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन -14 लाख 12 हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर युनिट -14 लाख 78 हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय उरण – 14 लाख 76 हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय चौक – 13 लाख सात हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय कशेळे – 13 लाख सात हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय मुरुड – 30 लाख रुपये
ग्रामीण रुग्णालय म्हसळा – 14 लाख 71 हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय जसवली -11 लाख 91 हजार रुपये
ग्रामीण रुग्णालय पोलादपूर – 11 लाख 98 रुपये

मॉक ड्रिल झाले एकदाच
जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये मॉक ड्रिल हे 2021 साली झाले होते. मात्र, अन्य कोणत्याच उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये पार पडले नाही. मात्र, 2022 मध्ये सर्वच रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल पार पडले आहे.

Exit mobile version