चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर

मुंबई-गोवा महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांची पावले तयारीसाठी हळुहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. पुढील दोन दिवसांपासून हे प्रमाण वाढणार असून, त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासन व प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासह अपूर्ण असलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तसेच, कशेडी घाटाला पर्याय असणारा दुसरा बोगदा 5 सप्टेंबरला सुरू करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखर होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या कामांसह खड्ड्यात गेलेल्या मार्गामुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागणार होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करत अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. 3 सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माणगाव पोलिसांत ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कंबर कसली आहे.

यावेळी खड्डे बुजवण्यासाठी 4 अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या. त्यानुसार युद्धपातळीवर खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम सुरू आहे. तसेच, पाहणीदरम्यान 3 सप्टेंबरपर्यंत दुसर्‍या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्‍यांसह ठेकेदारांनी दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे यांनीही दुसर्‍या बोगद्याचे काम पूर्ण होईल अन् कोकणात जाणारे चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात दुसर्‍या बोगद्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच, पोलादपूरकडून खेडकडे येणार्‍या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. अंतर्गत कामेही अपूर्ण आहेत. दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे दुसर्‍या बोगद्यातून वाहतूक कितपत सुरू होईल याबाबत साशंकता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी बोगदा ते आरवलीपर्यंतच्या दोन्ही लेन सुरु आहेत. आरवलीपासून संगमेश्‍वरपर्यंत जवळपास एक लेन पूर्ण झाली आहे. सावर्डे वहाळ फाटा, आरवली येथील जोडरस्ते, संगमेश्‍वरपर्यंत काही ठिकाणी असलेली डायव्हर्जनच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येत आहे. महामार्गावर संगमेश्‍वरपासून उक्षीपर्यंत एक लेन काही भाग सोडल्यास पूर्ण होत आली आहे. याठिकाणचे डायव्हर्जन डांबरीकरणाने भरले जात आहे. वांद्रीपासून निवळीपर्यंत आणि हातखंब्यात काही ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट आहे. हातखंबा टॅब ते पालीपर्यंत बर्‍यापैकी रस्ता झाला आहे. पालीपासून पुढे दोनशे मीटरपर्यंत रस्त्याचे काम सुरु असून पुढे काँक्रिटीकरण झाले आहे. आंजणारी घाट रस्ता बर्‍यापैकी झाला असल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनआक्रोश समिती करणार पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26 ऑगस्ट रोजी पाहणी करून 3 सप्टेंबरपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आश्‍वासन कोकणवासींना दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीमध्ये आवश्यक सुधारणा झाली आहे का, याची खात्री करण्यासाठी मुंबई-गोवा जनआक्रोश समिती उद्या 4 सप्टेंबरपासून पळस्पे ते कासू दरम्यान दौरा करून महामार्गाची सद्यस्थिती तपासणार आहे. या महामार्गावर त्यानंतरही खड्डे निदर्शनास आल्यास यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना जाब विचारू, असे जनआक्रोश सदस्यांनी स्पष्ट केले आहे.

कशेडी बोगदा 5 सप्टेंबरला सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बोगद्यातील काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. प्रकाशव्यवस्थेची कामे हाती घेण्यात आली असून, 100 हॅलोजन आणि 50 ट्यूबलाईट तात्पुरत्या स्वरूपात लावल्या जाणार आहेत, तसेच गटारांची लाईनही तात्पुरती सुरू केली जाईल.

– पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

Exit mobile version