पेनाल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता बनला आहे. गतविजेत्या फ्रान्सला 3-3 च्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवत 36 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यापासून आक्रमक खेळ करणार्या अर्जेंटिनाला फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने चांगलेच झुंजवले. त्याने गोलची हॅट्ट्रिक करत एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेला सामना बरोबरीत आणला. मात्र, अर्जेंटिनाने शेवटपर्यंत झुंज देत गतविजेत्यांना पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशी पराभवाची धूळ चारली. याचबरोबर अर्जेंटिनाने पेनाल्टी शूटआऊटवर विजय मिळवण्यात विश्वविक्रम देखील केला.
अर्जेंटिनाच्या मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केला. दुसरा एंजेल डी मारियाने केला. मात्र, दुसर्या हाफमध्ये किलियन एमबापेने 97 सेकंदांत 2 गोल केले. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. पहिल्या 15 मिनिटांत एकही गोल झाला नाही, पण पुढच्या 15 मिनिटांत मेसीने गोल करत अर्जेंटिनाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मग एमबापेने पेनल्टीवर गोल करत सामना 3-3 ने बरोबरीवर आणला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना जिंकला. अशा प्रकारे फुटबॉलमधील युरोपची जादूही 20 वर्षांनंतर ओसरली. चषक युरोपच्या बाहेर गेला.
अर्जेंटिनाने फ्रान्सविरूद्धची पेनाल्टी शूटआऊट 4-2 अशी जिंकत आपला वर्ल्डकपमधील सहावा पेनाल्टी शूटआऊटमधील सामना जिंकला. याचबरोबर अर्जेंटिना वर्ल्डकप इतिहासातील सर्वात जास्त पेनाल्टी शूटआऊटमधील सामने जिंकणारी एकमेव टीम ठरली. आतापर्यंतच्या वर्ल्डकप इतिहासातील फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर मिळवलेला पेनाल्टी शूटआऊटमधील हा तिसरा विजय ठरला. यापूर्वी 1994 मध्ये ब्राझील विरूद्ध इटली आणि 2006 मध्ये इटली विरूद्ध फ्रान्स यांच्यातील वर्ल्डकप फायनल सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला होता.
चर्चा मेसीची, पण लक्ष एमबापेकडे
35 वर्षीय मेसीने करिअरमध्ये सर्वात मोठी ट्रॉफी जिंकली. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून तो वरचढ राहिला. आता तो निवृत्ती घेत आहे. दुसरीकडे, केवळ 2 वर्ल्डकपमध्ये 12 गोल करणारा एमबापे सध्या 24 वर्षांचा होणार असल्याने किमान 3 वर्ल्डकप खेळू शकतो. हा वेग राहिल्यास सर्वात यशस्वी खेळाडू बनू शकतो.
वर्ल्डकपवर दृष्टिक्षेप
आजवर 22 वर्ल्डकपमध्ये 12 वेळा युरोपचे 5 देश जिंकले. जर्मनी (4 वेळा), इटली (4), फ्रान्स (2), इंग्लंड (1), स्पेन (1). या देशांत एकूण 34 कोटी लोकसंख्या आहे, जी जगाच्या 770 कोटींच्या 4% आहे. दक्षिण अमेरिकी देश एकूण 10 वेळा विजेते झाले. ब्राझील(5 वेळा), अर्जेंटिना (3 वेळा), उरुग्वे (2 वेळा). या दृष्टीने ब्राझील सर्वात जास्त चॅम्पियन ठरला. मात्र 2002 नंतर यश नाही.
गोल्डन बॉल
लियोनेल मेसी अर्जेंटिनाला करिअरचा पहिला वर्ल्डकप मिळवून दिला. स्पर्धेत 7 गोल केले.
गोल्डन बूट
किलियन एमबापे फायनलमध्ये हॅट्ट्रिकसह स्पर्धेमध्ये 8 गोल केले.
गोल्डन ग्लोव्ह्ज
एमी मार्टिनेज, बेस्ट गोलकीपर, पेनल्टी शूटमध्ये फ्रान्स संघाला 4-2 वर रोखले.
यंग प्लेयर अवॉर्ड
एन्जो फर्नांडेज अंडर-21 बेस्ट फुटबॉलपटू, सर्व सामन्यांत तुफानी खेळ.