। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील आराध्या विनोद पुरो हीने विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके पटकावली आहेत. तसेच, गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये वयाच्या 9 व्या वर्षी शंभरावे पारितोषिक पटकावून अनोळखा इतिहास रचल्याने विविध स्तरांतून तिच्या यशाबद्दल गौरव करण्यात येत आहे. आराध्या पुरो ही उरण एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. आराध्या ही गेल्या दोन वर्षांत 100 स्पर्धांमध्ये सहभागी होत प्रत्येक स्पर्धेत ती यशस्वीही झाली आहे. दरम्यान, ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धा रविवारी (दि.2) कोरम मॉल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत सहभाग घेत तिने शंभराव्या स्पर्धेत शंभरावा प्रथम क्रमांक पटकावला आहे. या निमित्ताने दोन वर्षात तिने तिच्या बक्षिसांची शंभरी पूर्ण केली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल उरण तालुक्यासह जिल्ह्यातून कौतुक होत आहे.