। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील एका विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.10) घडली आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या ड्रायव्हरनेच पीडित विवाहितेच्या घरात घुसून हा प्रताप केला आहे. या घटनेने परिसरात प्रचंड संताप निर्माण झाला असून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद अरुण भगत असे या ड्रायव्हरचे नाव आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीवर गेल्या अनेक महिन्यांपासून तो चालक म्हणून काम करीत आहे. शनिवारी रात्री 36 वर्षीय पीडित महिला तिच्या घरात एकटी असल्याचा फायदा घेत प्रसाद भगत तिच्या घरात घुसला. त्याने तिला मागून मिठी मारून तिचा विनयभंग केला. अचानक झालेल्या या गैरप्रकाराबाबत महिलेने आरडाओरड केला. त्यामुळे प्रसादने तिच्या कानाखाली मारून तेथून पळ काढला. विवाहितेवर झालेल्या विनयभंग प्रकरणानंतर स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सत्तेतल्याच आमदारांच्या ड्रायव्हरकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होऊ लागला आहे. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.