अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश
| नेरळ | प्रतिनिधी |
माणगाव टेकडीपासून वाहणारे पाणी रेल्वे मार्गाखालून जाण्यासाठी असलेले साकव पुलाची रुंदी कमी असल्याने नेरळ गावातील पाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे रेल्वेकडून रेल्वे मार्गिकेच्या खाली असलेल्या साकव पुलाची रुंदी वाढवण्यात यावी, अशी मागणी नेरळ ग्रामस्थ 2018 पासून करीत होते. पावसाळ्यात नेरळ गावात शिरणारे पाणी याचा बंदोबस्त करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून साकव पुलाची पाणी वाहून जाण्याची क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नेरळ गावातील पाडा, मातोश्रीनागर भागात पावसाळ्यात महापुराची भीती कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे मार्गावर नेरळ रेल्वे स्टेशनवरून कर्जतकडे जातांना किमी 86/0 ते 87/0 मध्ये असलेल्या पूल क्रमांक 86/5 आहे. त्या पुलाखालून पाणी वाहून जाण्यासाठी असलेली रुंदी कमी असल्याने तेथून पाणी वेगाने पुढे वाहते. त्याचा परिणाम पावसाळ्यात सतत पाऊस सुरु असल्यास मोठ्या प्रमाणात पाणी त्या साकव पूलमध्ये अडकते आणि ते पाणी आजूबाबाजूंच्या लोकवस्तीत शिरते. त्यामुळे पाडा आणि मातोश्रीनगरमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत असते आणि मोठ्या प्रमाणात सामानाची नासधूस होते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थ सूर्यकांत चंचे यांच्याकडून मध्य रेल्वे प्रशासनकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचवेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे आणि नेरळ ग्रामपंचायतीकडे तसेच मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता.
खासदार बारणे यांनी नेरळ स्थानकात बैठक घेतले त्यावेळी सूर्यकांत चंचे यांनी त्या साकव पुलांची रुंदी वाढवण्यात यावी, अशी मागणी केली होती. पाडा विभागातील अनेक ग्रामस्थांनी त्यावेळी खासदारांकडे ती मागणी केली होती 2025 मध्ये रेल्वे अधिकारी यांनी स्थानिक ग्रामस्थ तसेच नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्यासमवेत पाहणी झाली होती. त्यानंतर आता पाडा भागातील त्या साकव पुलाचे रुंदी वाढवण्याचे काम सुरु असून, 21 मीटर लांबीचे साकव पूल बांधण्यात येत आहे. त्याचा परिणाम पाडा आणि मातोश्रीनगरमध्ये पावसाळ्यात महापुराचे पाणी लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.






