| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, ही मागणी रेल्वे खात्याकडून साफ फेटाळण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस ट्रेनचा मार्ग बदलला जाणार असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन बंद झाली होती. ही ट्रेन आता फक्त दिवा स्थानकापर्यंतच येते आणि तिथूनच सुटते. इतक्या लांब जाणे मुंबईतील प्रवाशांसाठी सोयीचे नसल्याने त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कोकणातील पदाधिकारीही होते. खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्र्यांना रत्नागिरी-दादर किंवा सीएसटीएम अशी ट्रेन सुरु करण्याच्या मागणीचे पत्र रेल्वे दिले. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अशी सेवा सुरु करणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले. त्यामुळे रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन आता दादर स्थानकापर्यंत येण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.






