। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वावे, उसर परिसरात एका भामट्याने ऑनलाईन आर्थिक लुट करण्याचा उपद्रव सुरु केला आहे. मासळी विक्रेत्यांपासून भाजी व हॉटेल व्यवसायिकांना टारगेट करून त्यांच्याकडून आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार घडत आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांकडे माहिती देऊन ही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत नाराजीचे सुर उमटत असून चोरट्यांना पोलिसांकडून अभय दिला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन फसवणूक व आर्थिक लुट होऊ नये. तसेच वेगवेगळ्या आकर्षक जाहिरातीला फसू नका असे आवाहन पोलिसांकडून कायमच केले जात आहे. जिल्ह्यात ऑनलाईन लुट रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. आर्थिक लुट करणारे निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन केले जात आहे. पोलीसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत असतानाही ऑनलाईन लुट करणार्या भामट्याविरोधात रेवदंडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याची प्रतिक्रिया समाजात उमटत आहे.
अलिबाग तालुक्यातील वावे, उसर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून खैरे परिसरातील एका तरुणाने ऑनलाईन आर्थिक लुट सुरु केली आहे. मासळी विक्रेत्यांपासून हॉटेल, भाजी विक्रेत्यांना टारगेट करून त्यांच्याकडून पैसे बळकावण्याचा फंडा सुरु केला आहे. पंधरा रुपयांचे लिंबू खरेदी करून पंधरा रुपये जी पे करण्याचा बहाणा करीत त्याच्या बनावट जीपेमधून पंधराशे रुपये जास्त गेल्याचा दिखावा त्याने केला आहे. त्यानंतर एका हॉटेल व्यवसायिकांकडूनदेखील त्याने वडापाव खरेदी केल्याचा बहाणा करीत जास्त पैसे ऑनलाईनला गेल्याचे सांगून आर्थिक लुट करण्याचा त्याने प्रयत्न केला. या परिसरात त्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. त्याचा उपद्रव वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा तरुण खैरे परिसरातील असून त्याच्याविरोधात दुसर्या जिल्ह्यातदेखील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. तो वीस ते 22 वर्षाचा तरुण असून अशाच प्रकारची फसवणूक करीत आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांकडे तक्रार करण्यास गेलेल्या व्यक्तींची तक्रार न घेता त्याला पकडून आणतो. त्यानंतर तुम्हाला बोलावतो असे सांगून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. लुटमार करणार्या विरोधात कारवाई का केला जात नाही. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल का केला जात नाही. पोलिसांचे आर्थिक हितसंबंधत तर नाहीत ना अशा अनेक प्रकारची चर्चा केली जात आहे. चोरट्याला पोलिसांकडून अभय का दिला जात आहे. घटना घडून अनेक दिवस उलटून गेले, तरीदेखील कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील आठ दिवसांपूर्वी चौल परिसरात एका टेम्पाला पर्यटकाच्या गाडीने धडक दिली. नाशिकमधील पर्यटकाने टेम्पो चालकाला मारहाण केली होती. मात्र पोलिसांनी राजकीय दबावापोटी पर्यटकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार सर्वज्ञात असताना पुन्हा रेवदंडा पोलिसांचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संबंधित घटनेची माहिती माझ्यापर्यंत आली नाही. परंतु याबाबत माहिती घेऊन संबंधिताविरोधात कारवाई केली जाईल.
श्रीकांत किरवले
सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा
पोलिस अंमलदाराचा अजब कारभार
ऑनलाईन आर्थिक लुट करणार्याविरोधात तक्रार करण्यासाठी व्यवसायिक पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या महिला अंमलदारांच्या ही बाब लक्षात आणून दिली. तक्रार करू नका, त्याला शोधून आणतो. त्यानंतर तुम्हाला बोलावले जाईल .त्यावेळी तुम्ही पोलीस ठाण्यात या असे सांगून पोलीस अंमलदारांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. पोलीस अंमलदारांच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केला जात आहे.