| माणगाव | प्रतिनिधी |
उन्हाळा म्हणजे रान फळांची मेजवानी घेऊन येणारा ऋतू असतो. इतर कोणत्याच ऋतूत न मिळणारी फळे, फुले खास या ऋतूत मिळतात. यामध्ये जांभळे, करवंदे, आठुरणी, कोकम इत्यादी फळांचा समावेश असतो. उन्हाळी दिवसात तयार होणारी ही फळे म्हणजे खवय्यांसाठी चविष्ट असा गोडवा असतो.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर आंबा, काजू इत्यादी फळांवरोबर सर्वसामान्यांच्या आवडीची असलेली खास अशा गोडव्याची फळे म्हणजे जांभळे आणि करवंदे होत. रानाची मैना म्हणून करवंदांच्या उल्लेख केला जातो. कोकणातील डोंगर रांगात दिसणार्या लहान-मोठ्या विस्तीर्ण अशा करवंदाच्या जाळी म्हणजेच विविध पशुपक्ष्यांसाठी निवारा तर असतोच त्याबरोबरीने उन्हाळी दिवसात हिरव्या पानातून डोकावणारी काळाकभिन्न करवंदांची फळे सर्वांनाच आवडतात. करवंदांप्रमाणे डोंगर भागात जांभळीची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उन्हाळी दिवसात तयार होणारे तुरट गोड चवीची फळे खायला चविष्ट असतात. जांभळाचे आयुर्वेदात असंख्य उपयोग सांगितले आहेत. जांभळे मधुमेहींसाठी खास औषधी म्हणून आहेत. हाडकी, मांसवाली , मनुकांच्या आकाराची तर काही टपोरी असणारी जांभळे खवय्यांसाठी पर्वणी असते. उन्हाळी दिवसात तयार होणार्या या जांभळांना चांगली मागणी असून 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे ती विकली जातात.
करवंदे,जांभूळ बरोबरच लालचुटुक रंगांनी मन वेधून घेणारी कोकमाची फळे ही या ऋतूमध्ये तयार होतात. आमसूल, सरबत तयार करण्यासाठी उपयुक्त असलेली ही फळे गृहिणींच्या खास आवडीचे असतात. आयुर्वेदातही या फळांचे अनेक उपयोग, गुणधर्म सांगितले आहेत. 200 ते 300 रुपये किलो प्रमाणे ही फळे विकली जातात. करवंदे, जांभळे, कोकम या बरोबरच आठूरणी, मंदुकली इत्यादी लहान-मोठी फळे खवय्यांसाठी पर्वणी असते.
ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार
या रांमेव्याव्याच्या विक्रीतून ग्रामीण भागातील अनेक महिलांना हक्काचा रोजगार मिळतो.करवंदे 10 ते 20 रूपये वाटा विकला जातो.पळसाच्या पानात करवंदाची विक्री केली जाते.रान मेव्यानी भरलेला करवंदाचा द्रोण दिसायला सुंदर व आकर्षक असतो.कोकम 50 ते 100 रुपये किलोने विकला जातो. जांभळे 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विकली जातात.
वटपौर्णिमेला मोठी मागणी
उन्हाळ्यातील रान मेव्याचा हा गोडवा खवय्यांच्या पसंतीचा असून याची चव वर्षभर मनात रेंगाळत राहते. उन्हाळा ऋतू संपत असताना पुढील काही दिवसांत रानमेव्याचा आनंद भरभरून घेतला जाईल. वटपौर्णिमेच्या निमीत्ताने ही रान मेव्याला चांगली मागणी असते सुवासिनी वाणात आवर्जून या रान फळांनी वाण सजवितात. रान फळांचा हा हंगाम खास वटपौर्णिमे पर्यंत सुरू राहतो. त्यानंतर मात्र रान फळांचा हंगाम निघून जातो.
रानफळांना विशिष्ट गोडवा असतो. हा गोडवा खास उन्हाळी दिवसात चाखायला मिळतो. कोकणात खास करून वैशिष्ट्यपूर्ण असलेली रान फळे आहारात उपयुक्त असून, आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यांच्या विक्रीतून ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार मिळतो. गृहिणी रान मेव्यातून विविध पदार्थ तयार करतात.
नीलिमा मोंडे,
गृहिणी