बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमीत्त उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
| मुंबई | वार्ताहार |
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारीला जन्मदिवस आहे. त्यादिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे हे 22 जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7 वजाता गोदावरी तीरावर आरती करतील. 23 तारखेला ’दार उघड बये दार उघड’ असा जगदंबाची आराधना करणार आहेत.
अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे. ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आता अयोध्येतील मंदिर अर्धवट आहे. मंदिराचे पूर्ण बांधकाम झालेले नाही, तरीही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकार्पण करत आहेत. हिंदू धर्मात पौष महिन्यांत शुभ कार्य करत नाहीत. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे घेणार रामाचे दर्शन
नाशिकला गोदावरी नदीची करणार महाआरती
काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी सानेगुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघर्ष करावा लागला होता. राम हा माझासुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता. 22 जानेवारीला संध्याकाळी 6.30 वाजता काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गोदावरी नदीची महाआरती करणार आहोत, अशी माहिती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दादर या ठिकाणी असलेल्या पुतळ्याला अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रभू रामचंद्र पंचवटीत वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्याने पूजित झालेला तो परिसर आहे. हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही गोदातीरी महाआरतीही घेणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 23 जानेवारी हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. या वर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे शिबीर नाशिकला होणार आहे. तसेच 23 जानेवारीच्या संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब या ठिकाणी शिवसेनेची सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 22 जानेवारीला कोण-कोण जाणार, कुणाला निमंत्रण आहे. यामध्ये मी पडणार नाही. कारण हा अभिमान आणि अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राम मंदिराचे लोकार्पण हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये, असे ठाकरे म्हणाले. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही आयोध्येलाही जाऊ. आत्ता मान-पान पाहण्याची वेळ नाही. ही एक अस्मिता जपण्याची गोष्ट आहे असे ठाकरेंनी सांगितले.






