नाशिकच्या क्रिकेटपटूकडे दुर्लक्ष
| नाशिक | प्रतिनिधी |
क्रिकेटच्या विश्वात भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा नाशिकचा अंध खेळाडू अनिस बेग याच्यावर सद्यःस्थितीला मजुरी करण्याची वेळ ओढावली आहे. विश्व करंडक जिंकल्यानंतर राज्य शासनाने आश्वासनांची खैरात केली; पण खेळाडूंच्या पदरी काहीच न पडल्याने अनिससारख्या दिव्यांग खेळाडूंना आज भटकंतीची वेळ आली आहे. आयपीएलफ संघातील खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली जाते. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचे बक्षिसे दिले जातात. त्यांना मिळणारा मानसन्मान तर एखाद्या सेलिब्रिटीलाफ लाजवेल असा असतो.
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला राज्य शासनाकडून अंध खेळाडूंची दखलही घेतली जात नसल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. भारतीय क्रिकेट संघात अष्टपैलूफ म्हणून त्याचा समावेश करण्यात आला.
2017 च्या टी-20फ अंधांच्या विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात अनिसने चांगली कामगिरी केली. भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली होती. चषक जिंकला म्हणून केंद्र सरकारने प्रत्येक खेळाडूला दहा लाख रुपयांची मदत केली. त्या वेळी राज्य सरकारनेही घोषणा केली; प्रत्यक्षात या खेळाडूंना काहीच मिळाले नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून अनिसने शासकीय नोकरीसाठी पुण्याला अर्जही सादर केला. दोन वेळा कागदपत्रांची पूर्तता केली; पण अजून त्याला यश मिळालेले नाही. नाशिक रोडच्या सुभाषनगर भागातील झोपडपट्टीत अनिस बेग सध्या कुटुंबासमवेत राहातो. दोन्ही डोळ्यांमिळून त्याला जवळचे फक्त दहा टक्के दिसते. घरात आई, पत्नी व सहा वर्षांची मुलगी असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी अनिसवर आहे. शासनाच्या मदतीचे पैसे हे वडिलांच्या उपचारासाठी आणि उसनवारीत संपले. आता हाती नोकरीही नसल्याने मजुरी करावी लागते. डोळ्यांना दिसत नसल्याने कामावर ठेवण्यासही मर्यादा येतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्याचे सांगतानाही त्याला आता लाज वाटते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राज्य शासनाने दिव्यांग खेळाडूंबाबत ठोस निर्णय घेतला पाहिजे. माझ्यासारखे असंख्य खेळाडू आज मोलमजुरी करतात. दिव्यांग असल्याने त्यांच्या कामांनाही मर्यादा पडतात. त्यांना शासनाने नोकरी दिली पाहिजे.
अनिस बेग, आंतरराष्ट्रीय खेळाडू