गुलाबी रंगाने महिला प्रवासी खुश
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी अनेक कामे सुरु आहेत. त्यात फलाट एकवर मंजूर असलेले उद्वाहन उभारण्याचे काम सुरु झाले आहे. उद्वाहन उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून, त्या उद्वाहनचा रंग महिलांचा आवडता रंग गुलाबी असल्यामुळे महिला प्रवासी आनंदल्या आहेत.
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी मिनीट्रेन जात असते. त्याचवेळी नेरळ-माथेरान घाटमार्गाने टॅक्सी सेवेच्या माध्यमातून प्रवासी माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ स्थानकात येत असतात. सर्वाधिक पर्यटक प्रवासी हे रेल्वेने आणि प्रामुख्याने मुंबई या भागातून येत असतात. त्यावेळी प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात नेरळ स्थानकात विकासकामे सुरु आहेत. त्यात अनेक पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. महिला प्रवासी आणि पर्यटक यांच्यासाठी फलाट दोनवर उद्वाहन उभारण्यात आले होते. मात्र, फलाट एकवर उद्वाहन उभारण्यात आले नव्हते. काही महिन्यांपूर्वी फलाट एकवर उदवाहन उभारण्याचे काम सुरु झाले होते. सध्या त्या उद्वाहन कामाला अंतिम स्वरूप येत असून, नेरळ स्थानकात उभारण्यात येत असलेले उद्वाहन हे वेगळ्या रंगाचे बनले गेल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः गुलाबी रंग हा महिला वर्गाचा आवडता रंग असल्याने महिला वर्गाने या रंगात उभारण्यात आलेल्या उद्वाहनचे कौतुक केले आहे. अंतिम टप्प्यात कार्य असलेले हे उद्वाहन तात्काळ प्रवासी वर्गाच्या सेवेत यावे, अशी मागणी होत आहे.





