घाण व दुर्गंधीचे साम्राज्य; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
| पाली | प्रतिनिधी |
पाली, येथील प्रबुद्ध नगर परिसरात सुरू असलेल्या मुख्य नाल्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून कासवगतीने सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांना भीषण नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेले हे काम फेब्रुवारी महिना संपला तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. या अर्धवट कामामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून परिसरात दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य पसरले आहे.
येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की प्रबुद्ध नगरमधील मुख्य नाल्याच्या बांधणीचे काम प्रशासकीय संमतीने सुरू करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराच्या संथ कारभारामुळे हे काम गेल्या चार महिन्यांपासून रेंगाळले आहे. सध्या या उघड्या आणि अर्धवट नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून सांडपाणी साचून राहत आहे. साचलेल्या पाण्यावर डास, कीटक आणि जीवजंतूंचा प्रचंड फैलाव झाला असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
परिसरातील सांडपाण्याची व्यवस्था कोलमडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही कामाची गती वाढत नसल्याने ‘या परिस्थितीला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल आता रहिवासी विचारत आहेत. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नोव्हेंबरपासून या नाल्याचे काम सुरू आहे, पण चार महिने उलटूनही ते पूर्ण झालेले नाही. अपूर्ण कामामुळे येथून वाट काढताना येत नाही. तसेच साचलेल्या घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी आणि डासांचा त्रास सहन करावा लागतोय. घाण साचल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याला काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.
सुगंधा परेश जाधव,
रहिवासी, प्रबुद्ध नगर, पाली
नाल्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात ठेकेदारासोबत बोलणं झाला आहे. काही दिवसातच नाल्याच्या राहिलेल्या कामास सुरुवात करून काम पूर्ण करण्यात येईल.
सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली
