| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील धांनसर गावातील स्मशानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महत्वाचं म्हणजे चोरांनी स्मशानातून कोणताही किमती एवज चोरून नेलेला नसून, मृतदेहाला अग्नी देण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारे लोखंडी खांब चोरांनी चोरून नेले आहेत. घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मधील धांनसर गावात चौकळशी समाजासाठी स्मशानभूमी आहे. या स्मशान भूमीत हा प्रकार घडला. महत्वाचे म्हणजे पालिकेतर्फे चौकळशी समाजासाठी राखीव असलेल्या या स्मशानभूमीच्या स्थलांतराचा घाट घालण्यात आला असून, पालिकेतर्फे गावात नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत गावातील चौकळशी समाजाने अंत्यविधी उरकावेत या करिता अग्रही असलेल्या पालिका प्रशासना कडून हरकती व सूचना नोंदवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
दरम्यान पालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवर गावातील चौकळशी समाजाच्या वतीने हरकत नोंदवण्यात आली असून, एका खाजगी विकसकाच्या फायद्यासाठी समाजाची स्मशान भूमी हटवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
समाजबांधव करणार तक्रार
स्मशानभूमीत झालेल्या चोरी विरोधात आक्रमक झालेले चौकळशी समाज बांधव या चोरी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पालिकेच्या जाहिरातीवर हरकत
धानसर गाव येथील सर्वे क्रमांक 133 ब येथील स्म्शान भूमी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्या बाबत हरकती व सूचना सुचवण्यासाठी पालिके मार्फत विविध वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जाहिराती नुसार पालिका प्रशासनाने धानसर गावात मराठा, आगरी व बौद्ध समाजासाठी एकत्रित रित्या नव्याने स्मशान भूमी बांधल्याचा उल्लेख केला आहे. मात्र या जाहिरातीत चौकळशी समाजाचा उल्लेख नसल्याने गावात मोठ्या संख्येने असलेल्या चौकळशी समाजा साठी पालिकेने वेगळी व्यवस्था केली आहे का? कि चौकळशी समाजावर अन्याय करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.