जिल्ह्यातील साडे तीन हजार शाळा-महाविद्यालये बंद

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुट्टी

| रायगड | खास प्रतिनिधी |

राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार केला आहे. नद्यांना पुर तसेच दरडी पडण्याच्या घटना घडत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यासह रायगड जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार 21 जुलै रोजी जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने गुरुवारी (दि.20) शाळांची घंटा वाजली नाही.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश म्हसे यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत. रायगड जिल्ह्याला 19 जुलै रोजी रेड अलर्ट तर 20 जुलै ऑरेंज अलर्ट दिला होता. त्या आधीपासून तीन दिवस सातत्याने पाऊस सुरूच होता. सातत्याने पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने पुरसदृर्श परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये या आधी विविध आपत्ती झाल्या आहेत. त्यामुळे कोणतीच जोखीम न पत्करता जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

आज शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी सकाळापासून जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 191 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या दोन हजार 442 शाळा आहेत, तर नववी ते दहावीच्या सुमारे 650, कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या 250च्या आसपास आहेत, तर 130 महाविद्यालय आहेत. यामध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. पावसामुळे एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर हा परिसर प्रामुख्याने संभाव्य दरडग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जुलै 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर महाड तालुक्यातील जुई, दासगाव, कोंडीवते, रोहण या गावांवर दरडी कोसळल्या होत्या. त्यामध्ये 212 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मध्ये महाड आणि पोलादपूर तालुक्यातील तळीये, साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे दरडी कोसळल्या होत्या. 84 जणांना प्राण गमवावा लागला होता.

भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील 72 गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने ‌‘नैसर्गिक धोके सौम्यीकरण पथदर्शी प्रकल्प’ राबविला आहे. रायगडमधील 72 दरडग्रस्त गावांपैकी चार गावे (वर्ग 1) अतिधोकादायक, 6 गावे (वर्ग 2) धोकादायक आणि 62 गावे (वर्ग 3) सौम्य धोकादायक आहेत.

Exit mobile version