96 किलो गांजा जप्त
। पुणे । प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह एकूण तीन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून 96 किलो गांजा, दोन चार चाकी वाहनासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांच्यासह गस्त घालत असताना दोन चार चाकी वाहनांमधून गांजाची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती बातमीदार मार्फत मिळाली. त्यानुसार पुणे-नाशिक महामार्गावरील रोहकल फाटा या ठिकाणी नाकाबंदी करून दोन्ही वाहन ताब्यात घेण्यात आली. दोन्ही वाहनातील एकूण तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात एका महिलेचादेखील समावेश होता. वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनात एकूण 96 किलो 204 ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांच्यासह महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.