जिते आरोग्य केंद्रातील तीन कर्मचारी निलंबित

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवकांनी चुकीचे लसीकरण केले. हा ठपका ठेवत तीन आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेने केली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे. पेण तालुक्यातील जिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक मे रोजी 5 बालकांना गोवर रुबेला लस देणे आवश्यक असताना त्यांना तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बी.सी.जी. लस दिली. या लसीचा परिणाम बालकांच्या आरोग्यवर झाला. बालकांच्या शरीरावर जखमा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला.या प्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली.

आरोग्य सहाय्यक विकास पाटील, आरोग्य सहाय्यक प्रियांका म्हात्रे, आरोग्य सेवक कोमल पाटील यांच्याकडून कर्र्तव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तिघांना निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच जिते गावातील सारा ठाकूर या 12 वर्षीय मुलीला 26 जूलै रोजी मण्यार जातीचा सापाने दंश केला होता. तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तिच्यावर उपचार करण्यास दिरंगाई करण्यात आली.या घटनेच्या दिवशी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील हे आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी हजर नसल्याचे समोर आले आहे. तसेच मे महिन्यात चुकीचे लसीकरण झाले, या प्रकरणात डॉ. मिलिंद पाटील यांनी क्षेत्रीय कामाचे व्यवस्थितरीत्या पर्यवेक्षण केले नसल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. डॉ. मिलिंद पाटील यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आरोग्य सेवा संचालक आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी उपस्थित असणे गरजेचे आहे. यापुढे मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देणार आहे. या भेटीवेळी जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बालकांचे लसीकरण करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version